पुष्पसेन सावंत उच्च माध्यमिक विद्यालय वाडीहुमरमळा या विद्यालयाची स्थापना सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात झाली. सुरुवातीला पहिली दोन वर्षे म्हणजेच सन 2015 16 या शैक्षणिक वर्षापर्यंत आपल्या कॉलेजला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मोजकेच पंधरा-वीस विद्यार्थी सोबत घेऊन कॉलेजची वाटचाल सुरू होती. आपल्या कॉलेजला मिळणारा प्रतिसाद कमी का? या प्रश्नावर जेव्हा विविध स्तरावर विचार करण्यात आला तेव्हा काही गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त स्टेट बोर्ड शिकवणाऱ्या कॉलेजची संख्या भरपूर, दर चार-पाच किलोमीटरवर कॉलेज, अनुदानित कॉलेज कडे प्रवेश घेण्याची विद्यार्थी पालक यांची मानसिकता या बाबी समोर आल्या. त्याचबरोबर अजून सगळ्यात महत्त्वाची आणि गांभीर्याने घेण्यासारखी बाब समोर आली ती म्हणजे प्रवेश परीक्षांची तयारी.

आपल्या जिल्ह्यातील दहावी बोर्ड परीक्षांचा निकाल पाहिला तर कोकण बोर्डात वर्षानुवर्षे आपला जिल्हाच अव्वल असतो आणि हे गुणवत्ताधारक विद्यार्थी दहावीनंतर चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळवण्यासाठी जिल्हा सोडून किंवा आपलं राज्य सोडून बाहेर जात होते. गेल्या ४-५ वर्षांपूर्वी दरवर्षी ७०-८० विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या त्यामध्ये इंजीनियरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर, इत्यादींच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी जिल्हा सोडून, घर आई-वडिलांपासून लांब जाऊन राहत होते. इयत्ता दहावी झालेला विद्यार्थी म्हणजे वय वर्षे १५ ते १६ या वयोगटातील असतो. एवढ्या कमी वयात बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन राहणे, खाण्यापिनेतील बदल, राहणीमानातील बदल, वातावरणातील बदल हे सगळं स्वीकारून राहणे विद्यार्थ्यांसाठी अवघड असते. बरं हे सगळं स्वीकारत अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे त्यातून चांगला निकाल देणे या गोष्टी शक्य होत नाही. जिल्ह्यातील पालक-विद्यार्थी यांना होणाऱ्या आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासावर एक उपाय काढायचा असं स्वर्गवासी पुष्पसेनजी (नानाजी) सावंत यांनी ठरवलं. मग हा सक्षम उपाय काय असेल तर ज्या दर्जाच्या शिक्षणासाठी आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी-पालक जिल्हा सोडून बाहेर जात आहेत, त्याच दर्जाचं शिक्षण आपल्या जिल्ह्यात उपलब्ध करून देणे. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य यांची बैठक झाली आणि या बैठकीतून सिंधुदुर्ग ॲकॅडमी ही संकल्पना उदयास आली.

पुष्पसेन सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स हे कॉलेज तर पूर्वीपासूनच सुरू होते. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून कॉलेजला सिंधुदुर्ग ॲकॅडमीची जोड मिळाली. सर्वप्रथम ॲकॅडमी मध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी की ज्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल अशी वातावरण निर्मिती केली. त्यामध्ये वातानुकूलित वर्ग खोल्या, स्मार्ट बोर्ड, प्रशस्त वाचनालय, अध्ययवत प्रयोगशाळा, वसतिगृह, स्कूलबस, सीसीटीव्ही, इत्यादी सोयी-सुविधा निर्माण केल्या गेल्या.

या सगळ्या भौतिक सुविधांची पूर्तता झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग राहिला तो म्हणजे JEE-NEET शिकवणारे शिक्षक. त्यासाठी आपण राजस्थान-कोटा, हैदराबाद, दिल्ली, लखनऊ, बिहार या राज्यांमधील उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक आपल्या जिल्ह्यात उपलब्ध करून दिले. हे शिक्षक नियुक्त करताना आपल्या जिल्ह्यातील बहुतांशी विद्यार्थी हे स्टेट बोर्ड करत दहावी पास झालेले असतात. या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिला. कारण बाहेरच्या राज्यातील शिक्षण हे अगदी पहिलीपासून NCERT मधून झालेले असतं. त्यामुळे जे बाहेरच्या राज्यातून शिक्षक आपण सिंधुदुर्ग ॲकॅडमी मध्ये नियुक्त केलेत. त्यांना आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी हा स्टेट बोर्डचा आहे. त्याला हळूहळू NCERT कडे न्यावा लागणार याची कल्पना दिलेली असते व त्याप्रमाणे त्यांची शिकवणी सुरू असते.

२०१७-१८ या सिंधुदुर्ग ॲकॅडमीच्या पहिल्याच शैक्षणिक वर्षी जिल्ह्यातील २० पालकांनी-विद्यार्थ्यांनी ॲकॅडमी वर विश्वास ठेवला व प्रवेश घेतला. त्यानंतर ॲकॅडमी मार्फत दिले जाणारे उच्च प्रतीचे शिक्षण, सोयी-सुविधा, शिस्त या गोष्टी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील पालकांचा आपल्या ॲकॅडमीकडे कल वाढू लागला. पुढच्याच वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये आपली ॲकॅडमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावारूपास आली. आपल्या जिल्ह्यामध्ये चालणारे शिस्तबद्ध कामकाज बघून ३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर पहिल्याच बॅच मधून आपल्या ४ विद्यार्थ्यांचे इंजीनियरिंग गव्हर्मेंट कॉलेजला प्रवेश निश्चित झाले. त्याचबरोबर ३ विद्यार्थी आर्किटेक्चर कॉलेजला पात्र झाले, ३ विद्यार्थ्यांना NIT नागपूर कॉलेज मिळाले. हे निकाल पाहून तसेच सिंधुदुर्ग अकॅडमीची शिस्तबद्ध कार्यपद्धती पाहून जिल्ह्यातील जबाबदार पालक आपल्या ॲकॅडमीशी जोडले गेले. त्यापासून प्रवेश परीक्षांची खात्रीशीर तयारी करून घेणारी जिल्ह्यातील विश्वसनीय संस्था म्हणून पुष्पसेन सावंत ज्युनिअर कॉलेज आणि सिंधुदुर्ग ॲकॅडमी नावारूपाला आली.